मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे 2020 सालचे ’मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ आज त्यांच्या 79 व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपडा, नाना पाटेकर आदी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल ’सामना’चे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख 11 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
24 एप्रिल हा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन. या दिवशी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱयांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समदानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबोळकर, डॉ. निशित शहा यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.






