कल्याणच्या बेपत्ता तरुणीचे गूढ अजूनही कायम; पोलीस पडले बुचकळ्यात

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कल्याणच्या बैलबाजार परिसरात राहणारी १९ वर्षीय तरूणी महिनाभरापासून बेपत्ता आहे. या तरुणीच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने एकीकडे पोलीस बुचकळ्यात पडले आहेत, तर दुसरीकडे या तरुणीच्या घरची मंडळी चिंताग्रस्त झाली आहेत. उज्वला दिलीप गोईकणे (वय १९) असे या बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.

उज्वला ही कल्याण पश्चिमेकडे वल्लीपिर रोडला बैलबाजार परिसरातील कृष्णा नगरमध्ये आपल्या माता-पित्यासमवेत राहते. ती २७ मार्च रोजी मध्यरात्री अडीच ते पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घरातून बेपत्ता झाली. घरच्यांनी सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. यामुळे हतबल झालेल्या ५६ वर्षीय दिलीप धोंडीराम गोईकणे यांनी स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच व्यथा मांडत आपली मुलगी बेपत्ता झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी सदर तरुणीच्या पित्याने दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता म्हणून नोंद करून तपास सुरू केला.

दाखल झालेल्या तक्रारीवरून बेपत्ता उज्वलाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक कीर्ती जावरे या गेल्या महिनाभरापासून शोध घेत आहेत. मात्र अद्याप तिचा मागमूस लागलेला नाही. तर दुसऱ्या एका घटनेत १८ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास साधारण ५ फूट २ इंच उंचीचा, सडपातळ बांध्याच्या एक इसम कल्याणच्या वाडेघर सर्कल येथील लक्ष्मी मंगल कार्यालयासमोर बेवारस स्थितीत पडलेला आढळून आला.

बिट मार्शल पोलिसांनी सदर इसमाला जुबेर आणि फैजू या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तात्काळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या इसमाची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तशी नोंद घेण्यात आली आहे. या इसमाचे नाव, पत्ता आणि त्याच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नसून सपोनि कीर्ती जावरे अधिक तपास करत आहेत. सदर बेपत्ता तरूणी आणि मृत इसमाबद्दल काही माहिती मिळाल्यास संबंधितांनी बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here