नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे बीडचे पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. दररोज मृत्यूचा नवीन रेकॉर्ड बनत आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी रुग्णालय प्रशासनाचा असंवेदनशील चेहरा उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाच्या वॉर्डात कोरोना रुग्णाचा मृतदेह २० तास तसाच खितपत ठेवण्यात आला होता आणि तशातच बाजूला दोन कोरोना संक्रमित महिलांवर उपचार केले जात होते. तर दुसरीकडे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या एकाच शववाहिनीतून २२ मृतदेह घेऊन जात असल्याची दुर्दैवी घटना आढळून आली.

बीड जिल्ह्यात रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षक श्री आर राजा स्वामी रस्त्यावर उतरलेले दिसले. त्यांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अनेक लोकांवर कारवाई केली. बीड जिल्ह्यात झपाट्याने होणारा कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी बोलताना “बीडची जनता विनाकारण बाहेर फिरू नका, अत्यावश्यक काम असल्यास बाहेर पडा. ही कोरोना जंग आपण जिंकूया”, असे आवाहन पोलीस अधीक्षक आर. राजा स्वामी यांनी नागरिकांना केले.

सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊननंतर अजूनही काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. तसेच अनेक दुकाने आणि सलून अर्धवट शटर उघडून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागत आहेत. तसेच कोरोनावर आळा घालण्यासाठी जिल्यात ४ मेपासून सर्वत्र अँटीजेन चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here