बाजार सांवगीत पोलीस पाटलाची दुकानदारी? वर्तणूक प्रमाणपत्रासाठीही घेतो सर्वसामान्यांकडून पैसे

पोलीस व महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) – बाजार सावंगी येथील पोलीस पाटील कारभारी नामदेव नरवडे हा शासनाच्या विविध ठिकाणी लागणारे वर्तणूक प्रमाणपत्र देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून दोनशे ते तीनशे रुपये महसूल प्रशासनाचे नाव पुढे करीत फी म्हणून जमा करत आहे. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनादेखील त्याने वेठीस धरले आहे.

कारभारी नामदेव नरवाडे हा अवैध धंदेवाल्यांकडून, वाळू ठेकेदारांकडून, दारुवाले, जुगारवाले, देशी विदेशी गावरान दारु विक्रेते यांच्याकडूनही महिन्याकाठी तीस ते चाळीस हजार रुपये हप्ता म्हणून वसुली जमा करीत आहे. सध्या तरी या पोलिसपाटलाची बाजार सावंगीत दुकानदारी जोरात सुरु असून, याची ही दुकानदारी झिरो पोलीस व पोलीस यांच्या आश्रयाखाली सुरु आहे.

त्याला काही खादाड पोलीस कर्मचारीही सामील आहेत. त्यांच्या जोरावर हा पोलीस पाटील सर्वसामान्य नागरिकांना उध्दट भाषेत दमदाटी करतो. महसूल प्रशासनाच्या मानधनावर काम करणाऱ्या या पोलीस पाटलाचे मानधन बंद करून याची पोलीस पाटीलकी रद्द करण्यात यावी. या पोलीस पाटलांनी तर कायदा व सुव्यवस्थेची पार वाट लावून टाकली आहे. तरी एस.डी.एम उपविभागीय अधिकारी कन्नड व तहसीलदार खुलताबाद यांनी स्वतः लक्ष देऊन या पोलीस पाटलाची दुकानदारी, हप्ता वसुली थांबवण्यात येऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे याबाबतीत उपविभागीय अधिकारी, महसूल कन्नड यांना निवेदनही देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here