कोरोना निर्बंधांच्या काळात गुंडाच्या अंत्यविधीला शेकडो दुचाकींची रॅली

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोनाच्या निर्बंधांच्या काळात लोकांना घरात थांबण्याचे आवाहन पोलिसांनी केले. दरम्यान बिबवेवाडी परिसरातील सराईत गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर सहकानगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्याच्या शेकडो समर्थकांनी दुचाकीची रॅली काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कोरोना कायद्याचा व विना परवानगी रॅली काढल्याप्रकरणी शेकडो जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईताच्या अंत्यविधीला शेकडो दुचाकींची रॅली काढण्यात होती, याप्रकरणी १५० ते २०० जणांविरूद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके याच्यासह १५० ते २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र केंजळे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तर पोलिस नाईक परशुराम व्हन्नाप्पा पिसे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माधव हनुमंत वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत माधव वाघाटे याचा खून केला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे शेकडो जणांनी त्यांच्या दुचाकीवरून रॅली काढली. टोळक्याने बालाजीनगर, धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही, टोळक्याने रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here