नॉन कोविड गर्भवतीची अखेर कोविड वॉर्डात केली सुटका
पनवेल-सोगावकर – केवळ आधारकार्ड नाही म्हणून अडलेल्या गर्भवतींना उपचार नाकारण्याचा नादानपणा शहरातील डॉ. पटवर्धन हॉस्पीटलच्या प्रशासनाने केला आहे. त्यामुळे नॉन कोविड गर्भवती मातेचे बाळंतपण मोठा धोका पत्करून उपजिल्हा रूग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये करावे लागले. त्यानंतर आई आणि बाळाची कळंबोली येथील एमजीएम रूग्णालयात सुखरूप रवानगी करण्यात आली आहे. दुसर्या महिलेला मात्र, नाईलाजाने खासगी हॉस्पीटल गाठावे लागले आहे. हे अवघ्या सात हजाराच्या हव्यासापोटी घडले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर मार्गावरील राष्ट्रीय सेवक संघामार्फत चालविण्यात येणार्या डॉ. प्रभाकर पटवर्धन हॉस्पीटलमधील लाजिलवाणी घटना आहे आणि तितक्याच प्रशासनाच्या बेशरमपणामुळे संघाच्या शिकवणीसह निःस्पृह सेेवेलाच तिलांजली दिली गेली आहे. या घटनेनंतर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. वैभव गायकवाड यांचे तक्रारीतून लक्ष वेधले आहे. तर बाळंतपण केंद्राचे श्रेय लाटणारे महापालिका आयुक्त आणि त्यांचे चाहते सध्या कुंभकर्णी झोपेत आहेत.
पनवेल उपजिल्हा रूग्णालयात कोविडच्या रूग्णांनी जागा व्यापल्याने नॉन कोविड गर्भवती महिलांच्या प्रसुतीची गैरसोय झाली आहे. पनवेल महापालिकेने गेल्या वर्षी कोळीवाडा येथील दिलेली इमारत आता जाणीवपूर्वक लसीकरणासाठी राखून ठेवल्याने नॉन कोविड गर्भवती महिलांच्या प्रसुतीला मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केलेल्या मागणीनंतर डॉ. प्रभाकर पटवर्धन हॉस्पीटलमध्ये उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, अडलेल्या गर्भवतींचे बाळंतपण करणार आणि त्याबदल्यात पटवर्धन हॉस्पीटलला महात्मा ज्योतिबा फुले जनअरोग्य योजनेचा सात हजारांचा लाभ मिळणार, अशी ती देवाणघेवाण ठरली आहे.
मात्र, दोन दिवसांपूर्वी दुसर्या बाळंतपणासाठी करंजाडे येथून आलेल्या शितल ढेमरे यांचे बाळंतपण केवळ त्यांच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नसल्याने नाकारण्यात आले आहे. आधारकार्ड नसल्यास योजनेचा लाभ मिळणार नसल्याने हॉस्पीटल प्रशासनाने अवघ्या सात हजारासाठी मानवतेला काळिमा फासून अडलेल्या महिलेची प्रसुती करण्याचे नाकारले.
त्यानंतर दुसर्याच दिवशी धनादेवी जनाला ही नेपाळी महिला तिसर्या बाळंतपणासाठी आल्याने तिच्याबाबतीतही हॉस्पीटल प्रशासनाने हात वर करून तिच्या जीवाशी अक्षरशः खेळण्याचा प्रताप केला. या घटनेत धनादेवी फारच बिकट अवस्थेत असल्याने डॉ. स्वाती नाईक आणि डॉ. प्रियांका म्हात्रे यांनी धोका पत्करून एका आईसह तिच्या बाळाला वाचविण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये रात्री 9.30 वाजताच्या सुमारास सुखरूप सुटका केली. अवघ्या काही मिनिटात बाळंतपण झाले नसते तर दोघांच्याही जिवीताला धोका निर्माण झाल्याचे लक्षात घेत उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी जोखिम पत्करून महत्कार्य केले. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याने पुढचा कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी डॉ. सचिन संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनाही कळंबोली येथील एम. जी. एम. रूग्णालयात स्थलांतरित केले.






