नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – शनिवारपासून राज्याच्या विविध भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याचं पहायला मिळत आहे. वादळीवाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे कुठे झाडे उन्मळून पडत आहेत तर कुठे विजेचे खांब पडत आहेत. तसेच शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिकमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो क्विंटल कांदा भिजला यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस रोज जोरदार हजेरी लावत आहे. आज येवला, देवळा यासह इतर काही भागात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील होता त्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त फटका येवल्यात बसला असून येथे अनेक ठिकाणी कांद्याचे शेड जमीनदोस्त झाले. त्यामुळे त्यात साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांदा भिजून खराब झाला. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.






