मुंबई मध्यवर्ती कारागृहातील १६९ कैद्यांना दिली कोविड प्रतिबंधक लस

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई मध्यवर्ती (आर्थर रोड) कारागृहात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून 169 बंदीवानांचे लसीकरण मंगळवारी करण्यात आले आहे. विहित ओळखपत्र नसलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.

देशभरात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर लस घेण्यासाठी नागरिकांना सरकारने विहित केलेले ओळखपत्र सादर करावे लागते. मात्र, ज्या व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारचे विहित ओळखपत्र नाही, असे काही नागरिकही आढळत आहेत. उदाहरणार्थ बेघर व्यक्ती, साधू-संत, कारागृहातील बंदीवान, सुधारगृहात राहणाऱ्या व्यक्ती, मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये राहणारे नागरिक, वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ नागरिक, रस्त्याच्या कडेला राहणारे याचक आदी प्रकारातील काही नागरिकांकडे प्रसंगी ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले. अशा नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारातील नागरिकांकडे ओळखपत्र नसल्यास त्यांच्याशी संबंधीत शासकीय विभाग, संघटना, बिगर शासकीय संस्था इत्यादींच्या सहकार्याने अशा नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सविस्तर मार्गदर्शक असे निर्देश देखील केंद्र सरकारद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत.

मुंबई मध्यवर्ती (आर्थर रोड) कारागृहातील सुमारे 242 बंदीवानांचे लसीकरण यापूर्वी टप्प्या-टप्प्याने कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आले होते. सदर 242 बंदीवानांकडे विहित ओळखपत्र होते. मात्र, ओळखपत्र नसलेल्या बंदीवानांची होणारी अडचण लक्षात घेत आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने मध्यवर्ती कारागृहातच स्वतंत्र लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रात वैद्यकीय व इतर मनुष्यबळासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या केंद्राद्वारे विहित शासकीय ओळखपत्र नसलेल्या 169 बंदीवानांना मंगळवारी लस देण्यात आली. त्यासाठी मुंबई प्रोजेक्ट या बिगर शासकीय संस्थेचे सहकार्य लाभले.

कारागृहातील पात्र बंदीवानांना लस मिळत असल्याने कारागृहात कोविड – 19 संसर्ग फैलावास अटकाव करणे शक्य होणार आहे. तसेच बंदीवानांना बाहेर रुग्णालयात नेऊन लसीकरण करुन घेण्यासाठी पोलीस यंत्रणेवर येणारा ताण देखील वाचणार आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील पात्र बंदीवानांना यापुढेही आवश्यकतेनुसार लस देण्याबाबतची कार्यवाही वेळोवेळी मध्यवर्ती कारागृह लसीकरण केंद्रामार्फत केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here