कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – इचलकरंजी येथे गेल्या तीन दिवसांपासून संततधार बरसणार्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून पूर परिस्थितीची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीतीरी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना केल्या.
शहर व परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रासह कोकण विभागात दमदार हजेरी लावली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 68 फुटावर असून 71 फुटावर धोका पातळी आहे. या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम असून यंदा पहिल्याच टप्प्यात पंचगंगा पात्राबाहेर पडली आहे. गुरुवारी सायंकाळपासून जुना पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून यांत्रिक बोट, अग्निशामक दल आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गत दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत चालली असल्याने पूराची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी नदीतीरी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत माहिती जाणून घेतली. तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य सभापती संजय केंगार, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरअभियंता संजय बागडे, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, आपत्ती व्यवस्थापना टिम प्रमुख संजय कांबळे, आरोग्य निरीक्षक विजय पाटील, शितल पाटील अग्निशमन दल व रेस्क्यु फोर्सचे जवान, नगरपरिषदेचे आधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.






