मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मनी लॉण्डरिंगप्रकरणी ईडीने सूडबुद्धीने कारवाई करू नये यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक करू नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सरनाईक यांच्यासह मुलगा पूर्वेश, विहंग तसेच मेहुणा योगेश चांदेगला यांनीही याचिका दाखल केली असून त्यावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
प्रताप सरनाईक यांच्या विहंग व आस्था ग्रुपने विकासक योगेश देशमुख यांच्या मदतीने टिटवाळा येथील अनेक जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केला आहे. देशमुख हा सरनाईक यांचा निकटवर्तीय असल्याचाही त्यांचा दावा आहे. २०१४ साली ईडीने टिटवाळ्यातील हा भूखंड जप्त करून जागेचा कोणताही व्यवहार होऊ नये म्हणून स्थानिक महसूल प्राधिकरणास ताकीद दिली होती. मात्र जानेवारीत सरनाईक यांच्या मदतीने देशमुख यांनी ईडीने जप्त केलेला भूखंड विक्रीसाठी काढला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.






