मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्णत्वाला नेली जावीत. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिल्या.
राज्यात कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन या लाटेचा मुकाबला करण्यासाठीची राज्याची तयारी आणि करावयाच्या उपाययोजना याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील आरोग्य सेवा-सुविधा तसेच प्राणवायू उत्पादन निर्मिती व साठवणूक क्षमता यांची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातील कुठल्या सुविधा भविष्यात कायम स्वरूपी ठेवता येतील व कोणत्या सेवांचे श्रेणीवर्धन करता येईल, याचा आराखडा तयार करावा. आरोग्य संस्थांची जी बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात त्याची कालबद्धता आणि जबाबदारी निश्चित करावी. तसेच आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांच्या निर्माण व दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात यावा. उभारलेल्या आरोग्य सुविधा चालवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च याकडेही लक्ष दिले जावे. नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देतानाच पदांनाही मंजुरी दिल्यास कालापव्यय टाळता येईल.
दुर्गम भागातील आरोग्य सुविधांसाठी उद्योजक, संस्थांची मदत घेता येईल का याचाही विचार करावा. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणी संदर्भातील सादरीकरण करून ते कोणती जबाबदारी घेऊ शकतात हे त्यांना विचारावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संदर्भातील राज्यातील परिस्थितीची सर्वंकष माहिती देणारा देशातील सर्वोत्तम डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहे. या डॅश बोर्डवर राज्यातील ऑक्सिजन साठा, पुरवठा, वापर, रुग्णालयातील सर्व प्रकारच्या खाटा, त्यांची उपलब्धता, औषधे यांचीही जिल्हानिहाय माहिती मिळणार आहे. ही माहिती नियमित अद्ययावत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. सतीश पवार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







