बायको भेटायला येत नाही म्हणून हर्सुल कारागृहातील कैद्याचा अन्नत्याग

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – गेल्या वर्षभरापासून बायको आणि मुले भेटायला येत नाहीत, फोनवर बोलत नाहीत. यातच तिने दुसऱ्यासोबत लग्न केल्याचे कळल्यामुळे हर्सूल कारागृहातील एका कैद्याने अन्न त्यागले. त्याची तब्येत खालावत असल्याचे पाहून त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो उपचार घेत नव्हता. याची गांभीर्याने दखल घेऊन कारागृह प्रशासनाने थेट त्याच्या सासुरवाडीत संपर्क करून त्याची बायको, मुले आणि सासू-सासऱ्यांना बोलावून घेत त्यांची भेट घडवून आणली. त्यानंतर त्याने अन्नग्रहण केल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

काटकर टावर चव्हाण हा खुनाच्या गुन्ह्यात मागील साडेचार वर्षांपासून कारागृहात आहे. काटकर चव्हाण याला अटक केल्यापासून त्याची बायको मुलाबाळांसह माहेरी माळी जळगाव (ता. राहुरी, जि. अहमदनगर) येथे गेली आहे. वर्षभरापासून काटकर आणि त्याची पत्नी, मुलांची भेट झाली नाही. शिवाय पत्नी त्याच्यासोबत मोबाइलवरही बोलत नव्हती.

१५ ते २० दिवसांपूर्वी त्याने सासुरवाडीत फोन केला तेव्हा त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यातच मुलांसोबतही त्याचे बोलणे झाले नाही. यामुळे त्याने ३ जूनपासून जेवण घेणे बंद केले. प्रशासनाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here