मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळल्याने काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सर्व रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांना लगेचच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यातील काही रुग्ण बरे झालेले असून डेल्टा प्लसची लागण अद्याप एकाही लहान मुलास झालेली नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच करोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे एकाचवेळी २१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. केंद्र सरकारकडून मंगळवारी याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असून महाराष्ट्राला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राजेश टोपे यांनी आज राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांबाबत सद्यस्थिती मांडली.
‘राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिएंटमुळे शरिरातील अँटिबॉडिज कमी होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या तरी आम्ही सर्व २१ रुग्णांना विलगीकरणात ठेवले आहे. या रुग्णांची सर्व माहिती घेतली जात आहे. ट्रॅव्हल हिस्ट्री जाणून घेताना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे. यापैकी कुणी लस घेतली आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे’, असे टोपे यांनी नमूद केले.






