मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : संदेसरा घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने अभिनेता दिनो मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने या दोघांची अनुक्रमे १.४ कोटी आणि २.४१ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल १४५०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन एका बँकांना चुना लावला होता. याप्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि दिनो मोरिया यांचेही आर्थिक लागेबांधे असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे ‘ईडी’कडून गुन्हेगारी स्वरुपात मोडणाऱ्या आर्थिक व्यवहाराइतक्या रक्कमेची संपत्ती जप्त केल्याचे समजते.
स्टर्लिंग बायोटेक कंपनीच्या चेतन संदेसरा, नितीन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांनी बनावट कंपन्या स्थापन करुन बँकांकडून कर्ज घेतले होते. या कंपन्यांसाठी संदेसरा बंधुंनी आंध्रा बँक, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या परदेशातील शाखांमधून कर्ज घेतले होते. या माध्यमातून त्यांनी बँकांना तब्बल १४५०० कोटी रुपयांचा चुना लावला होता. त्यानंतर २०१७ मध्य संदेसरा बंधूंनी भारतामधून पलायन केले होते. ईडीच्या तपासात दिनो मोरिया आणि इरफान सिद्दीकी यांनी संदेसरा बंधुंशी आर्थिक व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ईडीकडून या दोघांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.






