मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : विधीमंडळात शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर भाजपच्या निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. तसंच २ प्रमुख मागण्या या आमदारांनी राज्यपालांकडे केल्या आहेत.
‘विरोधी आमदारांना बोलण्याची संधी न देता सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न करत लोकशाहीच्या सभागृहातच लोकशाहीचा गळा घोटला. आमच्याकडून कोणतीही शिवीगाळ अथवा धक्काबुक्की करण्यात आलेली नाही, त्यामुळे आम्हाला ही कारवाई मान्य नाही,’ अशा शब्दांत भाजपच्या निलंबित १२ आमदारांनी राज्यपालांसमोर भूमिका मांडली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर आपली बाजू मांडत असताना या विषयाचा संपूर्ण अहवाल मागवण्यात यावा. तसंच या प्रकरणी आपण सरकारला योग्य समज व सूचना द्यावी आणि लोकशाही मुल्यांची होणारी गळचेपी रोखावी, अशी मागणी निलंबित आमदारांनी राज्यपालांकडे केली.






