मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे आज बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दिलीपकुमार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त करून त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जावून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दिपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडीकिंग’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं ‘दिलीपकुमार’ बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते, पद्मविभूषण दिलीपकुमार यांचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.






