‘बेंचमार्क बिल्डकॉन‘ कंपनीकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वळते केल्याने ईडी करतेय चौकशी
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुबियांच्या बँक खात्यात ‘बेंचमार्क बिल्डकॉन‘ कंपनीकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वळते करण्यात आल्याने ते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या घोटाळ्यात खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे.
खडसे यांच्याविरोधात ईडीने बोगस कंपन्यांमार्फत पत्नी व जावयाच्या बँक खात्यात पैसे दिल्याच्या मुद्द्यावर चौकशी सुरु केली आहे. कोलकत्ता नोंदणीकृत अब्जयोनी, केमेक्स गुड्स, पर्ल डिलर्स, प्रोफिशियंट मर्कटाईज कंपन्यांमार्फत २० ते २६ एप्रिल २०१६ दरम्यान बेंचमार्क बिल्डकॉनच्या बँक खात्यात मोठ्या रकमा जमा झाल्या आणि प्रत्येकी दोन कोटी रुपयांची रक्कम जावई व पत्नीच्या बँक खात्यात वळती करण्यात आली. त्यातून जमीनमालकांना तीन कोटी ७५ लाख रुपये देण्यात आले. तर एक कोटी ७८ लाख रुपये मुद्रांक व नोंदणी शुल्क भरण्यात आली. या खरेदीशी आपला काही संबंध नाही, असा खडसे यांचा दावा असला तरी त्यांच्या बँक खात्यातून पत्नीच्या नावे ५० लाख रुपये पाठविण्यात आले आणि नोंदणीशुल्क भरले गेल्याचे तारखांच्या नोंदीवरुन दिसून येत असल्याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
बोगस कंपन्यांमार्फत चार कोटी रुपये मिळाले असले, तरी हे कर्ज असल्याचा दावा गिरीष चौधरी व मंदाकिनी खडसे यांनी चौकशीदरम्यान केला आहे. मात्र बेंचमार्क कंपनीचे मूळ भागभांडवल ४७ लाख ९४ हजार रुपये व सुमारे ५३ लाख रुपयांचे उत्पन्न असताना ११ कोटी रुपये उभारले गेले आणि त्यातून चार कोटी रुपयांचे कर्ज कसे दिले गेले, हा मुद्दा ईडीच्या चौकशीत उपस्थित करण्यात आला आहे. कर्जाच्या रकमेची परतफेड दोन वर्षात झालेली नाही आणि कर्जकरारही केला नसल्याचे दिसून आले आहे.
खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना ईडीने बुधवारी अटक केली. चौधरी आणि खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्या नावे एमआयडीसीच्या भोसरीतील जमिनीची खरेदी करण्यात आली होती. ही जमीन अब्बास उकानी यांच्या मालकीची होती ती एमआयडीसीने संपादित करुनही त्याची भरपाई मात्र देण्यात आली नव्हती. खडसे यांनी महसूलमंत्रीपदाच्या काळात एप्रिल २०१६ च्या कालावधीत या जमीनखरेदीची सूत्रे हालविली. महसूल, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यामुळे मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि हेमंत गावंडे यांनी न्यायालयात आणि एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर न्या. झोटिंग यांनी चौकशी केल्यानंतर फडणवीस सरकारने निर्दोष ठरवले होते. हे प्रकरण बंद करण्यासाठी पुणे येथील विशेष न्यायालयात अर्ज सादर केला आहे. मात्र सुनावण्या झाल्यावर तीन वेळा न्यायाधीशांच्या बदल्या झाल्याने हे प्रकरण प्रलंबित आहे.
दरम्यान ही जमीन एमआयडीसीच आहे, अशी भूमिका महामंडळाने सातत्याने घेतली आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा गैरवापर करुन विवादित शासकीय जमीन कुटुंबियांसाठी खरेदी केल्याचा आरोप खडसेंविरोधात झाला आहे. पण आता खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर हे प्रकरण उकरुन काढल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे







