मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या मातोश्री या निवासस्थानावरून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे या देखील गाडीत आहेत.
राज्यात कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे पाळावा लागत आहेत. यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोबत चालक घेणे टाळले आहे. गेल्या वर्षी देखील मु्ख्यमंत्री ठाकरे स्वत:च गाडी चालवत पंढरपुरात आले होते. तुफान पाऊस कोसळत असल्याने मुख्यमंत्र्यांनी नेहमीची मर्सिडीज गाडी टाळत रेंज रोव्हर ही गाडी घेतली आहे. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात.
उद्या, मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री सपत्निक पूजा करणार आहेत. मुख्यमंत्री पुढील ८ ते ९ तासांमध्ये पंढरपुरात दाखल होतील असा अंदाज आहे. त्यानंतर मध्यरात्रीनंतर पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे. आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे) आणि इंदुबाई केशव कोलते (वय ६०) हे महापूजा करणार आहेत. केशव कोलते हे गेल्या २० वर्षांपासून मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत.






