ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : “शोध स्वतःचा यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी” डॉ. नोंदमनोहर गजानन भोईर लिखित मोहिनीराज प्रकाशन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पोसू बाळ पाटील विद्यालय बाळे या वाकलन शाळेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी चार वाजता पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री हरिश्चंद्र कोंडाजी ठाकरे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे माननीय श्री उत्तम निवृत्ती वाघमारे गुरुजी माननीय श्री किशोर चौधरी सर, माननीय श्री रमेश पावशे सर, माननीय कुमार सागर शिंदे सर, आणि ज्योती फाऊंडेशनच्या संस्थापिका माननीय कुमारी ज्योती साठे, ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री शंकर भोईर उपस्थित होते.
यावेळी श्री रमेश पावसे सर यांनी लेखक शाळेत असताना च्या आठवणींना उजाळा दिला. श्री किशोर चौधरी सरांनी लेखक सामाजिक बांधिलकी म्हणून कशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत तसेच माजी विद्यार्थी संघटना ते उत्तम प्रकारे चालवून विद्यार्थ्यांसाठी नवे उपक्रम कसे राबवतात याबद्दलची सर्व माहिती सांगून आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या वेळी आपल्या दमदार वकृत्व शैलीत माननीय कुमार सागर शिंदे सरांनी चांगले मित्र आणि चांगली पुस्तके आपले आयुष्य कशाप्रकारे उत्तम आनंदी करतात हे पटवून दिले. तसेच नाईन स्टार या मैत्री ग्रुपचे लेखकाच्या आयुष्यात असणारे महत्त्व सुद्धा वर्णन केले , तसेच लेखकाकडे मनाची आणि शब्दांची श्रीमंती आहे याचाही ते आवर्जून उल्लेख करतात.
निवृत्ती वाघमारे गुरुजींनी लेखकाने अधिक खडतर परिश्रम घेऊन शिक्षण कसे पूर्ण केले त्याचे वर्णन ते करतात. पुढे ते म्हणाले की लेखकाची स्वप्न खूप आहेत. त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम आम्हा शिक्षकांचे जरी असले तरी आई-वडिलांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे आहे. लेखकाची पत्नी लेखकाला कशा प्रकारे प्रत्येक कार्यात सहभागी होऊन मदत करते याचे ही त्यांनी वर्णन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हरिश्चंद्र ठाकरे सर यांनी हे पुस्तक मनाचे सकारात्मक प्रोग्रामिंग करण्यासाठी कसे उपयुक्त ठरेल ते सांगितले.पुढे जाऊन ते म्हणाले “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण” या संत वचनाची आठवण करून देत म्हणाले मनाचे किती योगदान असते आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत ते त्यांनी सांगितले. या पुस्तकाचे वाचन करून एकेक भाग जरी आयुष्यात उतरविला तर आपला फायदाच आहे असेही त्यांनी नमूद केले .
लेखकाने या वेळी हे पुस्तक तरुणांना आपलं आयुष्य कशा प्रकारे यशस्वी आणि आनंदी करता येईल याबद्दल सांगितले. तसेच लेखक पुढे म्हणाले की प्रत्येक यशस्वी माणसासाठी मोठ्या चांगल्या माणसाची संगत खूप महत्त्वाची असते.आपल्याला आयुष्यात जे हवं आहे ते मिळवण्यासाठी यशस्वी माणसं ज्या रस्त्याने गेली तो रस्ता अवलंबन करणे खूप महत्त्वाचे आहे.
पिंटू,राजेंद्र, अनंता,योगेश, कल्पेश, प्रदीप, प्रेमनाथ, सुनील, प्रवीण या नाईन स्टार मित्रपरिवाराने आणि लेखकाची पत्नी रसिका भोईर यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. आनंद म्हात्रे यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आलेल्या सर्व पाहुण्यांचे,मान्यवरांचे, शिक्षकांचे, नातेवाईकांचे, माजी विद्यार्थी सर्वांचे आभार राजेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली, अशी माहिती प्रकाशक व मोहिनीराज चे संपादक सुभाष झेंडे यांनी दिली.






