संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील नद्या उलटल्या वडील आणि मुलगी वाहून गेल्याची घटना : कर्जत तालुका जलमय

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : येथे जवळपास 321.80 मि.मी. पावसाची नोंद झाली, रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने कर्जत तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या, मध्यरात्री नंतर उल्हास, पेज, शिलार नद्यांनी आपली पातळी ओलांडली,तालुका जलमय झाला, तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दामत येथे राहणारे वडील आणि त्याची मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे.

जोरदार पाऊस कोसळत होता, वीज पुरवठा खंडित झाला होता, कर्जत शहराच्या मध्यभागातून वाहणारी उल्हास नदी मध्यरात्री नंतर उलटली आणि काही कळण्याच्या आतच शहराच्या बाजारपेठ, कर्जत न्यायालय परिसर, इंदिरानगर, कोतवाल नगर मधील म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर मधील सत्यम अपार्टमेंट, निलेश अपार्टमेंट,चंदन अपार्टमेंट, मुद्रे येथील शिवम कॉम्लेक्स, नेमिनाथ रेसिडन्सी, सिद्धार्थ नगर ज्ञानदिप सोसायटी या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे घरातील वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या, घरातील धान्य, सोफे, गाद्या भिजल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरात पाणी घुसल्याने घरभर गाळ जमा झाला आहे, इमारतीच्या तळमजल्यात पाणी भरल्यानी नागरिकांनी इमारतीच्या टेरेस वर आश्रय घेतला होता.

karjat-flood

मुंबई -पुणे रेल्वे लाईन वर कर्जत स्टेशन पासून काही मीटर अंतरावर कोषाणे गेट नंबर 25 येथील वीज वाहक पोल पडले तर रुळा खाली माती,खडी वाहून गेली आहे, कडाव चांदई रस्ता पाण्यामुळे बंद झाला होता, रात्री झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील बीड ग्रामपंचायतमधील 8 गावांना जोडणा-या उल्हास नदीवरील मोहीली येथील पूलाच्या दोन्ही बाजुचे भाग वाहून गेले आहेत. परिणामी 8 गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे.

flood-at-karjat

उमरोली ग्रामपंचायत हद्दीत पाली वाडी शेजारी दरड कोसळली असल्याचे समजताच तत्काळ प्रांत वैशाली परदेशी-ठाकूर, तहसीलदार विक्रम देशमुख,नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी सदर घटनेची पाहणी केली.कर्जत मुद्रे बुद्रुक येथील दरड कोसळल्याने एका घराची भिंत कोसळली, तसेच भिसेगाव एसटी स्टँड येथे दरड कोसळली, रात्री उल्हास नदीची पातळी वाढल्याने नगरपरिषदेची अग्निशमन गाडी नदी किनारी सायरन वाजवून फिरवण्यात आली त्यामुळे नदी किना-यालगत चे नागरिक जागरूक झाले अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.

flood-water-in-home-at-karjat

दामत येथील सौशल्या सोसायटी समोर असलेल्या चाळीमधील एक कुटुंब रात्री 1-30 वाजता त्यांचे रूममध्ये पाणी आल्याने रुममधून बाहेर पडून पाण्यातून जात असताना त्यांचेपैकी इब्राहिम बाबुला मणियार वय-40 वर्षे व त्यांची मुलगी जोया वय-7 वर्षे असे वाहून गेले असल्याची घटना समोर आली आहे तर भुतिवली येथील आदिवासी वाडीतील काही बक-या, कोंबड्या चा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत अशी माहिती प्रांत वैशाली परदेशी- ठाकूर यांनी दिली. येत्या तीन -चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन कर्जत च्या प्रांत वैशाली परदेशी – ठाकूर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here