अनेकांचे संसार उद्ध्वस्त महाडमध्ये जलप्रलय : जिल्हा प्रशासन, नौदल आणि एनडीआरएफचे बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू
रायगड (प्रतिनिधा जयेश जाधव) : रायगड जिल्ह्यात गेले आठ दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून पुर्ण गाव दरडीखाली गारद होऊन ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण दरडीखाली गाडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वातावरण शोकाकुल झाले आहे. घटनास्थळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती ताई तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा प्रशासन , स्थानिक बचाव पथके, पोलीस एनडीआरएफ टीम, नौदलाची टीम यांच्या माध्यमातून बचाव आणि मदत कार्य शहरात पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे महाड तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून गांधारी आणि सावित्री नद्यांचे पाणी महाड मधील अनेक घरांमध्ये आणि बाजारपेठेत दहा ते बारा फुटापर्यंत चढल्याने महाड चे प्रचंड मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाडमध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. अदिती ताई तटकरे, स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. आणि महाड मधील पूरसदृश्य परिस्थितीची पाहाणी केली. या ठिकाणी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन, पोलीस, नौदल, एनडीआरएफ यांच्या माध्यमातून मुसळधार पावसात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये अनेक घरं आणि माणसे अडकली आहेत. महाड बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या नाते रोडवरील संपूर्ण तळीये गावातील घरांवर दरड कोसळून प्रचंड मोठी जीवीत हानी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला अनेक रहिवासी बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर गाव अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्याने गावाकडे जाणारे रस्ते खचल्याने आणि दरडी कोसळल्याने या ठिकाणी मदत कार्यात अडथळा निर्माण झाला आहे.
महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळीये गावात २२ जुलै रोजी संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दरड कोसळून सुमारे ३५ घरं गाडली गेली असून अनेक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरड नेमकी किती घरांवर कोसळली आणि त्यामुळे नेमकी किती माणसं अडकली आहेत, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
घटनास्थळी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम यांच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन तथा बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. तरीही परिस्थिती वर मात करून मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.






