उस्मानाबाद (प्रतिनिधी) : आपल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या हस्ते २० हजारांची लाच स्वीकारतांना भूम येथील उपजिल्हाधिकारी मनीषा राशिनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (२८ जुलै) रंगेहाथ पकडले आहे. महिना १ लाख १० हजार रूपयांची मागणी करण्याबाबत उपजिलाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, ताकमोडवाडी ता.परंडा येथील तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी, तीन ट्रक्टर हे विनाकारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू ठेवण्यासाठी महिना १ लाख १० हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. त्यावर तडजोड होवून दरमहा ९० हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते. उपविभागीय कार्यालय भूम येथे प्रतिनियुक्त असलेल्या कोतवालाकरवी ही रक्कम स्वीकारताना उपविभागीय अधीकारी मनीषा राशिनकर यांना पकडले आहे. मंगळवारी(२७ जुलै) ही कारवाई करण्यात आली, तक्रारदार ठरवलेल्या रक्कमेचा पहिला हप्ता २० हजार रुपये देताना तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यापूर्वी लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला होता.
उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या सूचनेनुसार २७ जुलै, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास भूम शहरातील अहमदनगर रोडवरील आयडीबीआय बँकेच्या जवळ असलेल्या चहाच्या टपरीजवळ सापळा लावण्यात आला. यावेळी ठरलेल्या रक्कमेचा पहिला हप्ता, २० हजार रुपये घेतांना कोतवाल विलास जानकरला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह, कोतवाल विलास जानकर यांच्याविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात आज (२८ जुलै) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरुद्ध कारवाईसाठी सापळा अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.विभाग उस्मानाबाद यांचा समावेश होता. या कारवाईसाठी डॉ. राहुल खाडे पोलीस अधीक्षक, ला.प्र. विभाग औरंगाबाद, ब्रह्मदेव गावडे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.विभाग औरंगाबाद यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.






