नागपूर (प्रतिनिधी) : सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर छापे टाकले. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ईडीनं वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावून देखील अनिल देशमुख उपस्थित राहात नसताना दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरूच ठेवली आहे. आज दुपारी ईडीनं अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळते आहे.
ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथील बंगल्यावर आणि मुंबईच्या वरळी येथील सुखदा अपार्टमेंटमध्ये असलेल्या निवस्थानी देखील छापे टाकले आहेत. मात्र, शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या श्री. साई शिक्षण संस्थेवरही छापे टाकले. या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत एनआयटी महाविद्याालय येते. एनआयटी महाविद्यालयात पॉलीटेक्निक, एमबीए आणि अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. मिळालेल्या महितीनुसात दुपारी ११ वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी महाविद्यालयात पोहचले व थेट कारवाईला सुरुवात केली.
चार वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीला हजर न झाल्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नेमकी अनिल देशमुख यांची चौकशी होणार का? आणि झाली, तर ती कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.






