१७ ऑगस्टपासून शाळा सुरु, या असतील मार्गदर्शक सूचना

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे कोविड मुक्त काही जिल्ह्यांमध्ये मध्यंतरी शाळा सुरू झाल्या होत्या. तर काही जिल्ह्यांमध्ये दीड वर्षांपासून विद्यार्थी घरी आहेत. त्यामुळे ते वर्गातील वातावरण विसरले आहेत. त्यांना पुन्हा त्या वातावरणात आणणे आवश्यक आहे.

त्यासाठी राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागामध्ये १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळा आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीकडून मिळणार्‍या सूचनांनुसार शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात आलेला होता. तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यासंबंधित आज शासनाने आदेश जारी केला आहे.

१७ ऑगस्ट २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

शिक्षण विभागाकडून याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झालेला असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे ब्रेक दि चेन अंतर्गत नव्या मार्गदर्शक सचूना आदेश २ ऑगस्ट नुसार काही जिल्ह्यांमध्ये कोविड काळातील निर्बंधांसंबंधी निर्णय़ाबाबत संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना व इतर जिल्हयांमध्ये शाळांसंबंधी निर्णयाबाबत शालेय शिक्षण विभागास अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हाव यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये शाळांचे वर्ग सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यापूर्वी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ७ जुलै २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार कोविडमुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर, ब्रेक दि चेन सुधारित मार्गदर्शक सूचना विचारात घेता कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची बाबही शासनाच्या विचाराधीन होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here