स्क्रॅपेज धोरणामुळे देशात सकारात्मक परिवर्तन होईल – पंतप्रधान

नवी दिल्ली : जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी लागू केले जात असलेले स्क्रॅपेज पॉलिसी म्हणजे देशाच्या विकासातला मैलाचा दगड आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले.

या मोहिमेत स्टार्टअप्स तसेच युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. अहमदाबाद येथे स्क्रॅपेज पॉलिसी लाँचिंग कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमस्थळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

वाहन स्क्रॅपिंगबाबतच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गुजरातमध्ये गुंतवणूकदार परिषद घेण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, स्क्रॅप उद्योगामुळे रोजगार निर्मिती होईल. उद्योग क्षेत्रात काम करीत असलेल्या लोकांकडे पुढील २५ वर्षांसाठी आत्मनिर्भर भारताचा रोडमॅप असला पाहिजे.जुनी धोरणे बदलावी लागतील आणि नव्या नीतीवर काम करावे लागेल.इथेनॉल असो, हायड्रोजन इंधन असो वा इलेक्ट्रिक मोबिलिटी असो, सरकारने वरील गोष्टींना प्राधान्य देऊन काम चालू केलेले आहे.संशोधन आणि विकासापासून ते पायाभूत सुविधापर्यंत उद्योगांना आपली भागीदारी वाढवावी लागेल. यासाठी जी काही मदत लागेल ती देण्यास केंद्र सरकार तयार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here