देशभरातील १५२ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा विशेष पदकाने गौरव

नवी दिल्ली : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या १५२ पोलीस कर्मचारी – अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील ११ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण १५ जणांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील ११, गोवा पोलिस दलातील १ आणि गुजरातच्या पोलीस दलातील ६ अधिकाऱ्यांनी हे पदक मिळविले आहे. तसेच या मानकऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील १०, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी ९, तामिळनाडू पोलीस दलातील ८ आणि बिहारचे ७, कर्नाटक आणि दिल्ली पोलिसांतील प्रत्येकी ६ आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये २८ महिला पोलीस अधिकारी देखील समाविष्ट असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पोलीस निरीक्षक ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा अमोल बढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका धीरज जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती प्रकाश तिपारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल ढालसिंग बाहुरे, पोलीस निरीक्षक मनोहर नारसप्पा पाटील, पोलीस उपअधिक्षक बाबुराव भाउसो महामुनी,पोलीस उपअधिक्षक अजित राजाराम टिके, पोलीस निरीक्षक सुनील शंकर शिंदे, पोलीस अधीक्षक सुनील देविदास कडसाने तसेच पोलीस उपअधिक्षक उमेश शंकर माने-पाटील यांचा पदकविजेत्यांमध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here