छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देतात – पंतप्रधान

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. शिवाय भारताचा वर्तमानकाळ आणि भूगोलसुद्धा त्यांच्या अमरगाथेने प्रभावित झालेला आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक खूप मोठा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या सध्याच्या स्वरुपाची भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच महाराजांबद्दल बाबासाहेबांना एवढी भक्ती आहे, असे गौरवोत्गार पंतप्रधानांनी काढले. पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष संदेश दिला.

बाबासाहेब त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत असतानाच आपला देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करतोय. बाबासाहेबांनाही हा योगायोग म्हणजे त्यांना भारतमातेने दिलेला आशिर्वादच वाटत असणार यात शंका नाही. असंही मोदी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेबांनी देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो आम्हाला कायमच प्रेरणा देत राहणार आहे, असंही मोदींनी बाबासाहेबांच्या कार्याचं कौतुक केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे त्यासाठी आपण सर्वच त्यांचे ऋणी राहू. या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देशाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे. मी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना मी करतो, अशा शब्दांसहीत मोदींनी बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here