ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे वाटेल याबद्दल विश्वास वाटतो. राज्यभरात राबविला जाणारा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

येत्या स्वातंत्र्यदिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे “ई-पीक पाहणी” प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ऑनलाईन पध्दतीने कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीतराम कुंटे, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जमाबंदी आयुक्त व संचालक निरंजन सुधांशू, टाटा ट्रस्टचे मुख्य सल्लागार जयंतकुमार बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप, यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी शेतकऱ्याला स्वत:चा सातबारा पहायला मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असे, पण आज शेतकऱ्यांना आपला सातबारा मोबाईलमध्ये पाहणे शक्य झाले आहे.काळाप्रमाणे बदलणे हा प्रकृतीचा नियम आहे असे आपण म्हणतो मग बदलत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पध्दतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणे, पीकांची माहिती मिळवून देणे यावर भर देत आहोत याचा आनंद वाटतो.कोणताही नवीन प्रयोग करताना यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण सर्वजण सांघिक प्रयत्न करतो. आपण सर्वांनी सांघिक प्रयत्न केल्यानेच आता आपल्या शेतकरी बांधवांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here