माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं पाचव्यांदा बजावले समन्स

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिलासा मिळावा यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी फेटाळल्या गेल्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना पाचवं समन्स बजावलं आहे. या समन्समध्ये उद्या (बुधवारी) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

या प्रकरणामध्ये चौकशीसाठी याआधी अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना देखील ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, अद्याप अनिल देशमुख यांची चौकशी होऊ शकलेली नाही. ईडीकडून पाठवण्यात येणाऱ्या समन्सला अनिल देशमुख यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नसल्यामुळे ईडीनं न्यायालयात देखील यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. आता बुधवारी सकाळी तरी अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here