शेतकरी कर्जफेड प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडील थकीत कर्जांची वसुली करण्यासाठी लहान मोठ्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करण्याचा धडाका सुरु केला आहे. आज (दि.१७) जिल्हा बँकेने कर्जवसुलीसाठी देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया ठेवली होती.

कुठल्याही परिस्थितीत कर्जाच्या वसुलीसाठी जमिनींचे लिलाव करु नये, मुद्दलापेक्षा व्याज अधिक असल्यास त्या व्याजाच्या रकमेवर ५० टक्के सूट द्यावी, दहा लाखांच्या आतील कर्जदारांच्या जमिनीचे लिलाव करु नये आदी मागण्यांकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक एस.एन.पिंगळे यांच्या दालनात त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

जमिनीचे लिलाव व कर्जाची सक्तीची वसुली थांबवा या मागण्यांकरिता बँकेच्या व्यवस्थापकांना घेराव घालण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, जिल्हा समन्वयक कुबेर जाधव , संपर्क प्रमुख श्रावण देवरे , उपजिल्हा अध्यक्ष रवींद्र शेवाळे , कळवण तालुका अध्यक्ष ,रामक्रुष्ण जाधव , कैलास शेवाळे , मालेगाव तालुका अध्यक्ष संजय जाधव , काशिनाथ जाधव , संजय शिरसाट,संदीप बोरसे आदी सह शेतकरी उपस्थित होते.

nivedan

 

१०० टक्के वसुली केवळ शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करुन नको – कुबेर जाधव
जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी १०० टक्के कर्जवसुली झाली पाहिजे याबाबत आमचेही दुमत नाही. पण साखर कारखाने, सूतगिरण्या व इतर सहकारी संस्थांच्या थकीत कर्जासाठी बँकेने जप्तीची कारवाई केल्यास आम्ही त्याचे स्वागतच करु. ५० लाखांच्यावरील सर्वच घटक व कर्जदारांच्या वसुलीसाठी त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात यावी मग त्यानंतर लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करावा. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करत असतात, अशा सर्व गरजू शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे.
– कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here