१२ आमदारांच्या नियुक्तीकरिता राज्यपालांनी दिले चर्चेचे निमंत्रण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढील आठवडय़ात सुटण्याची चिन्हे आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येत्या आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपल्याला चर्चेसाठी बोलावले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे, पण त्यावर राज्यपालांनी अजून निर्णय घेतला नाही. या नियुक्तीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे; पण आता लवकरच हा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले की, नवनियुक्त लोकायुक्त विद्याधर कानडे यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी राजभवनावर पार पडला. या शपथविधी सोहळय़ाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपण स्वतः आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम पुंटे व मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर चहापानाच्या वेळेस राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय झाला. त्यावर राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, तुम्ही एकदा या. आपण यासंदर्भात बोलू. त्यामुळे मी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवले आहे की, पुढील आठवडय़ात राज्यपालांची वेळ घेऊन राजभवनावर जायचे आणि चर्चा करायची आहे, असेही अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here