गांज्याची शेती करायला परवानगी द्या; शेतकऱ्याने कलेक्टरांना लिहिलेले पत्र झाले सोशल मिडीयावर व्हायरल

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : इतर पिकांना शासनाचा योग्य हमीभाव मिळत नाही, त्यामुळे माझ्या दोन एकर शेतामध्ये गांजा लावण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी एका शेतकऱ्याने थेट कलेक्टरकडे केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापुर या गावातील अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्यानी अशी मागणी केली आहे. या अजब मागणीचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

अनिल आबाजी पाटील यांचे शिरपूर या गावांमध्ये गट नंबर 181/4 वर 2 एक्कर शेती आहे. कोणतेही पीक घेतले तरी त्यात नुकसानच होत आहे, त्यामुळे प्रशासनाने मला दोन एकर गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती या पत्रात आबाजी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. गांजा हा अमली पदार्थ आहे. त्यामुळे गांजा पिकवण्याला कायदेशीर बंदी आहे. मात्र एक त्रस्त शेतकऱ्याने गांजाची शेती करायला परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. यावर आता जिल्हाधिकारी 15 सप्टेंबरच्या आत काय उत्तर देतात, हे पहावे लागेल.

ganja-letter

 

त्याने पुढे आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतात कोणतेही पीक घेतले तरी शासन त्याला हमीभाव देत नसल्यामुळे शेती तोट्यात आहे. शेतीभावाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीचा खर्च देखील निघत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता बिल वेळेवर मिळत नाही.

दुसरीकडे गांजाला चांगला भाव असल्यामुळे दोन एकर मध्ये गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. १५ सप्टेंबर पर्यंत परवानगी द्यावी अन्यथा १६ सप्टेंबर रोजी परवानगी आहे असे गृहीत धरून गांजा लागवड करणार आहे, त्यानंतर गुन्हा दाखल झाला तर त्यास प्रशासन जबाबदार आहे, असे या अर्जात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here