मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी धाडी टाकल्यानंतर आघाडी सरकारमधील हालचाली वाढल्या आहेत. राजकीय द्वेषातून धाडी टाकल्याचा आरोप शिवसेनेने केला असून परब हे आजच्या ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याचे सांगण्यात येते.
ईडीने परब यांना नोटीस पाठवली आहे. आज मंगळवारी परब यांना ईडी कार्यालयात हजर व्हायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर परब घाईघाईने प्रभादेवी येथील ‘सामना’ कार्यालयात आले. त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर परब लगेच परत गेले.
परब आज ईडी कार्यालयात स्वत: हजर राहणार नसून आपला वकील पाठवतील, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. नोटीस नेमक्या कोणत्या प्रकरणी पाठवली याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे तयारी करण्यास परब यांना वेळ हवा आहे. तसे ईडीला कळवण्यात येणार असल्याचे समजते.






