खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अक्षय बोऱ्हाडेला अटक

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : जुन्नर येथील गॅस वितरकाला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिलेप्रकरणी शिरोली बुद्रुक येथील अक्षय मोहन बोऱ्हाडे याला जुन्नर पोलिसांकडून मंगळवार रात्री उशिरा अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार बोऱ्हाडे याने जुन्नर मधील एच.पी. गॅस वितरक रूपेश प्राणलाल शहा यांचे नागरी वस्तीत गॅस सिलिंडरचे गोदाम असलेबाबत जुन्नर तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून माहीती अधिकारात माहीती मागविली होती. तसेच शहा यांना फोन करून पैशांची मागणी केली. माझी माणसे पाठविली आहेत, त्यांचेकडे पैसे दे, त्याचप्रमाणे वेळोवेळी माझ्या संस्थेत येणारा खर्च तुला करावा लागेल, नाहीतर मी तुझ्या विरोधात फेसबुक लाईव्ह करून तुझा व्यवसाय कसा चालतो तेच बघतो अशी धमकी दिली होती.

रूपेश शहा यांनी आरोपीस प्रतिसाद न दिल्याने आरोपीने पुन्हा जुन २०२१ मध्ये फोन करून पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. खंडणी मागितल्या प्रकरणी अक्षय मोहन बोऱ्हाडे याचेवर गुन्हा दाखल करून जुन्नर पोलिसांनी अटक केली व बुधवार रोजी प्रथम वर्ग मा.जुन्नर न्यायालयात आरोपीस हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहीती पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी दिली.

वरील गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करीत आहे. तरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरीकांनी खंडणी मागणी सारखे प्रकार होत असतील किंवा निदर्शनास आल्यास त्याबाबत निर्भयपणे पोलिसांत तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here