सोहम् कला गुणगौरव अकादमीच्या व्यासपीठावर शिक्षकदिन उत्साहात साजरा

मुंबई (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : ५ सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत डॉ. मीनल भोळे मॅडम संचालित सोहम् कला गुणगौरव अकादमीच्या व्यासपीठावर शिक्षकदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे हे ४४वे पुष्प होते. हे पुष्प गुंफण्यासाठी शिक्षण संवेदन मासिकातर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त चेंबूर वेल्फेअर मराठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश पंढरीनाथ गाडे प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आजचे हे युग ज्ञानयुग आहे. या ज्ञानयुगामध्ये विद्यार्थ्यांना घडवताना, त्यांचा विकास करताना त्यांच्या चौकस वृत्तीला वाव देणे महत्त्वाचे आहे. हा धागा पकडत मुख्याध्यापक – शिक्षक – विद्यार्थी – वर्तुळ पूर्ण करताना या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चेची सुरुवात रमेशजी गाडे यांच्या शालेय आठवणींना उजाळा देत, शालेय जीवनातल्या जडण घडणी पासून झाली.

संस्था- शाळा -मुख्याध्यापक- शिक्षक- विद्यार्थी हे एकाच धाग्यात सुसंवादाने गुंफून, आपण उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून कसं कार्य करू शकतो, हे स्वानुभवावरून पटवून दिले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यासाठी शाळेमध्ये विविध राबवले जाणारे विविध उपक्रम, शाळेचे यश या सर्वांवर दिलखुलास चर्चा करत विद्यार्थी व शिक्षकांचे तोंड भरून कौतुकही केले. याद्वारे सक्षम अशी चर्चा घडवून आणली. एक आदर्श, शिस्तप्रिय, संवेदनशील कार्यशील मुख्याध्यापकांबरोबरच एक चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळख यानिमित्ताने विद्यार्थ्यांना झाली.कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय भावोत्कट आणि मनाला स्पर्श करून गेल्या.

“स्पर्धेच्या युगात जगत असताना इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करा, जीवनमूल्य अंगीकारा, दुर्दम्यइच्छा शक्ती आणि सकारात्मक आशावाद असेल तर यशाला गवसणी घालणं शक्य होते.” पुढे सर म्हणाले की, “जीवन जगत असताना किती गुण मिळवले त्यापेक्षा किती गुणसंपन्न झाला आहत हे महत्वाचे आहे.” असा अनमोल संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.रंजना वडेकर मॅडम यांनी केले. तर प्रिया उपासनी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे आगामी आकर्षण सांगितले. सर्वांना एकत्र जोडण्याचे उत्तम काम तंत्रस्नेही गायत्री मॅडम यांनी केले. आणि सर्व कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी करण्याचे काम सोहम कला अकादमीच्या संचालिका डॉ.मीनल भोळे मॅडम यांनी पार पाडले .तसेच सोहम अकादमी नेहमीच नाविन्याचा ध्यास घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.त्याच अनुषंगाने विद्यार्थी,शिक्षक व पालक यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कलागुण दर्शनाचा सोहळा निशुल्क आयोजित करण्याचे सोहम अकादमीने जाहीर केले.तसेच विविध पदार्थांच्या कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवले आहे .यात मोठ्या संख्येने विद्यार्थी,शिक्षक व पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मीनल यांनी केले. अशाप्रकारे अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात विचारांचे मोती वेचत शिक्षकदिन उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here