लसीकरणाचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन
ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून कौटुंबिक हिंसाचार व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या १३ महिलांचे आज काजूवाडी आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
दरम्यान या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.शहरातील कौटुंबिक हिंसाचार व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने काजूवाडी आरोग्य केंद्रावर ‘’विशेष लसीकरण सत्र’’ आयोजित करण्यात आले होते.
या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र नसलेल्या महिलांना देखील या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. आज एकूण शहरातील १३ महिलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी उपस्थितीत सर्व महिलांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले. दरम्यान या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.






