कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे तर ३ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. ममता बॅनर्जी या भवानीपूरच्याच रहिवासी आहेत. त्यांनी २०११ आणि २०१६ अशा दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला होता.
या मतदारसंघातून भाजपच्या वतीनं उमेदवार म्हणून प्रियांका टिबरीवाल यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. डाव्या संघटनांच्यावतीनं श्रीजीब बिस्वास हेदेखील या रणसंग्रामात उतरणार आहेत. मात्र, या पोटनिवडणुकीसाठी कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरवण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलाय.
ममता बॅनर्जी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भवानीपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘खेला होबे’च्या जोरदार घोषणा दिल्या. ‘खेला होबे’ ही विधानसभा निवडणुकी दरम्यान हीट घोषणा ठरली होती.






