नवी दिल्ली : भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन महामंडळ अर्थात् आयआरसीटीसीने पर्यटकांना समुद्री प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी देशातील पहिली स्वदेशी आरामदायी क्रूझ सेवा काल (दि.१८) शनिवारपासून सुरू झाली आहे. खाजगी कंपनी कॉर्डेलियाच्या सहभागातून ही सेवा मुंबई ते गोवादरम्यान असून, प्रवासाची बुकिंग आयआरसीटीसी संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहे.
आयआरसीटीसीने भारतात प्रथमच वॉटरवेज लीजर टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडद्वारा संचालित कॉर्डेलिया क्रूझसोबत करार केला आहे. यातून प्रवाशांना आरामदायी सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय भारतीय लोकांना सुटीच्या कालावधीत हव्या असलेल्या सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आयआरसीटीसीच्या वतीने करून देण्यात आला आहे. क्रूझमध्ये किमान दोन हजार प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असून, गोवा, दिव, लक्षद्वीप, कोच्ची आणि श्रीलंका देशातील पर्यटनस्थळांना भेट देता येणार आहे. कोर्डेलिया क्रूझचा पहिला प्रवास शनिवारपासून सुरू झाला असून, पुढील वर्षापासून क्रूझचे बेस स्टेशन चेन्नईमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.
आयआरसीटीसीनुसार, क्रूझमधील प्रवाासभाडे तीन श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. इकॉनॉमी क्लासमधील एका प्रवाशाला मुंबई ते गोवादरम्यान दोन रात्रीच्या प्रवासासाठी १७ हजार ८७७ रुपये भाडे असेल. सी-फेसिंग खोलीसाठी एका व्यक्तीला मुंबई ते गोवासाठी दोन रात्रींसाठी २५,४८८ रुपये इतके भाडे द्यावे लागणार आहे. बाल्कनी रूम विथ सी-फेसिंग दृश्यासाठी एका व्यक्तीला हेच दोन स्थळ आणि कालावधीसाठी ३१,५०६ रुपये भाडे चुकवावे लागणार आहे. पंचतारांकित हॉटेलसारखी सुविधा असलेल्या क्रूझमध्ये स्वीमिंग पुल, बार, खुले चित्रपटगृह आदींचा लाभ घेता येणार आहे.
रम्यान, प्रवाशांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. तसेच, प्रवास सुरू करण्याच्या ७२ तासांपूर्वीची आरटी-पीसीआरचा नकारात्मक अहवाल सोबत ठेवावा लागणार असून, क्रूझमधील सर्व सदस्यांना लसीकरण करणे गरजेचे आहे.






