नाशिक (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ओझर (ता. निफाड) नगरपरिषद कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी आणि अर्जित रजेची रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे वैतागलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या मुलाने स्वतःला कोंडून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
ओझर येथील जगन्नाथ गोविंद मंडलिक हे ३० मार्च २०१९ रोजी निफाड तालुक्यातील ओझर नगरपरिषदेमधून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर साडेतीन वर्ष उलटून गेल्यानंतरही ग्रॅच्युटी आणि अर्जित रजेची रक्कम ५ लाख ४९ हजार रुपये मिळत नसल्याने जगन्नाथ हे वैतागले होते. त्यांना १० एप्रिल २०२१ रोजी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाला. यात त्यांचे निधन झाले. उपचारासाठी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ मुलावर आली. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी ही हक्काची रक्कम मिळावी म्हणून ओझर नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून ही रक्कम मिळत नसल्याने मुलगा दिनेश याने पेट्रोल बॉटल घेऊन स्वतःला कोंडून घेत आत्मदहनचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आत्मदहन करण्याचा निर्णय अखेर मागे घेतल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
जगन्नाथ गोविंद मंडलिक यांनी नगरपरिषदेमध्ये तब्बल ३९ वर्षे सेवा केली. या काळात सुट्टी असो, रात्र असो, की अजून काही. काम असले की त्यांना नगरपरिषदेमध्ये हजर रहावे लागायचे. इतर कामाला बाहेरही जावे लागायचे. तरीही निवृत्तीनंतर साडेतीन वर्षे लोटूनही त्यांना त्यांच्या हक्काची ग्रॅच्युटी आणि अर्जित रजेची टक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. कोरोनाच्या लाटेत जगन्नाथ यांना कोरोना झाला. तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यासाठीही मुलांना उसनवारी करावी लागली. कारण रुग्णालयाचे बिल वाढत गेले. या काळातही मुलाने आपल्या वडिलांची हक्काची रक्कम मिळावी यासाठी नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. शेवटी वैतागलेल्या मुलाने टोकाचे पाऊस उचलत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
Home उत्तर महाराष्ट्र नाशिक ओझर नगरपरिषद ग्रॅच्युटी, अर्जित रजेची रक्कम मिळत नसल्याने, मृत कर्मचाऱ्याच्या कर्जबाजारी मुलाचा...






