सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार करुन फरार आरोपीला हनी ट्रॅपच्या माध्यमातून पोलिसांनी घातल्या बेड्या

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : अल्पवयीन मुलीवर बलत्कार करून फरार झालेल्या वासनांध आरोपीला हनी ट्रॅप लावून अटक करण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. सुरज सारसद असे आरोपीचे नाव असून तो २४ वर्षांचा आहे. आरोपीने पोलिसांना खूप चकवा दिला. पण अखेर हनी ट्रॅपच्या माध्यमातून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीला घटनेनंतर जवळपास एक महिन्यांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी सुरज सारसद हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एक महिन्यांपूर्वी बलात्कार करुन फरार झाला होता. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून आरोपीचा शोध घेणे सुरु होते. विशेष म्हणजे आरोपी इतका चालाख होता की तो वारंवार आपला मोबाईल नंबर बदलत होता. तसेच तो वेळोवेळी जागा बदलत फिरत होता. त्यामुळे त्याला पकडणं हे पोलिसांसमोर एक आव्हान बनलं होतं. पण अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, पोलीस नायक जावेद तडवी, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस नायक राजाराम काळे यांची स्वतंत्र टीम आरोपीच्या शोधासाठी नियुक्त केली होती. ही टीम दिवसरात्र आरोपीला पकडण्यासाठी झटत होती.

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. एका गुप्त बातमीदाराने आरोपीबाबत महत्त्वाची माहिती दिली. आरोपी जरी मोबाईल नंबर बदलत असला तरी त्यांचा व्हाट्सअॅप नंबर सुरु आहे. आरोपीची गुन्हे करण्याची प्रक्रिया माहीत असल्याने एका पोलीस महिला मित्रच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावून, काल (२३ सप्टेंबर) ठाणे येुथील आनंद नगर येथे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला पकडण्यासाठी पीएसआय मल्हार थोरात यांच्या टीमने महिला पोलीस मित्रासोबत अक्षरश: बस, रिक्षा, पायी प्रवास करुन आरोपीपर्यंत पोहचले आहेत. एक गुन्हा करून, दुसऱ्या गुन्ह्याच्या तयारीत असताना आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here