उस्मानाबाद (प्रतिनिधी) : दुतोंडी मांडुळाची विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या ६ तस्करांच्या उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई उस्मानाबाद बायपास रोडवर शुक्रवारी रात्री केली. आरोपींकडून १ किलो ५०० ग्रॅम वजनाचे मांडूळ जप्त केले असून या मांडूळाची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दीपक एकनाथ शिंदे (वय -३५), विजय देवराम कटारणवरे (वय – ४७), संदीप बाळासाहेब लोखंडे (वय -२६), सुशांत बाळासाहेब गायकवाड (वय – २३ रा. नाशिक), अब्दुल आझम पटेल (वय – ६१ रा. परांडा ता. परांडा जि. उस्मानाबाद), रामा भीमा कांबळे (वय -४५ रा. बेगडा, ता. उस्मानाबाद) यांना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील आरोपींना दुतोंडी मांडूळ सापडले होते. हे मांडूळ विक्री करण्यासाठी ते उस्मानाबाद मध्ये मागील तीन दिवसांपूर्वी आले होते. आरोपी मांडूळ विक्रीसाठी अब्दुल पटेल आणि रामा कांबळे यांच्या मदतीने बडा ग्राहक शोधत होते. ग्राहक शोधण्याच्या त्यांचा प्रयत्न सुरू असताना ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलंगेकर, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने तसेच कर्मचारी जगदाळे, चव्हाण, ढगारे, ठाकूर, कोळी आणि अरब यांच्या पथकाने उस्मानाबाद बायपास रोडवर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर आरोपींनी मांडूळ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या कारवाईत ४० लाख रुपये किंमतीचे मांडुळ, आणि गुन्ह्यात वापरलेली ७ लाख रुपये किमतीची कार जप्त केली. आरोपींवर आनंदनगर पोलीस ठाण्यात वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक पांडुरंग माने करत आहेत.






