मुंबई (संपादक सुनिल पाटील) : छंदातून व्यवसायाकडे कसे जाता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी मुंबई यांनी आयोजित केलेली रसमलाई व कपकेकची कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेला श्रीमती प्राची पाटणकर मॅडम प्रशिक्षिका म्हणून लाभल्या. मुळातच होम बेकर ही त्यांची ओळख असून केक मध्ये सतत नवनवीन प्रयोग कसे करता येतील हे त्या बघत असतात. पारंपारिक पद्धती व आधुनिक पद्धती याचा सुरेख मेळ घालून कमीतकमी वेळात केक कसा करायचा ? सहज सोप्या पद्धतीने कुकर मध्ये केक बेक कसा करायचा ?केक साठी साहित्य काय वापरायचं? क्रीम कसे तयार करायचे? वेगवेगळ्या नोझल कुठल्या ? सजावट कशी करायची? या आणि अशा अनेक गोष्टींची उकल या कार्यशाळेमध्ये झाली .प्रत्यक्ष पाच वेगवेगळ्या फ्लेवरचे केक व रसमलाई केक याचे सुंदर प्रात्यक्षिक दाखवले.अश्या या केकच्या पहिल्या व दुसऱ्या भागातील कार्यशाळेला असणारा उत्तम प्रतिसाद हे या कार्यशाळेचे वैशिष्ट्य होते.

सोहम अकादमी कायमच नाविन्याचा ध्यास घेत असते आणि म्हणूनच अशा विविध कार्यशाळेद्वारे तसेच कार्यक्रमांद्वारे त्यांनी आजपर्यंत यशाचा आलेख कायम चढता ठेवला आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रीमती समीक्षा तावडे यांनी केले असून त्यांना श्रीमती प्रिया उपासनी , श्रीमती प्रीती उरणकर या सख्यांची साथ लाभली .तर तंत्रस्नेही गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले.
यावेळी दाखवलेले केक इतके अप्रतिम होते की उपस्थितांना आपणही अशाच प्रकारचे केक करावे व त्याचा यथेच्छ आस्वाद घ्यावा अशी तीव्र इच्छा झाली. उपस्थितांनी डॉ. मीनल मॅडम चे आभार मानून पुन्हा पुन्हा अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करावे अशी इच्छा प्रदर्शित केली.तसेच संचालिका डॉ.मीनल मॅडमनी प्राची मॅडमना केक च्या विविध प्रकारांच्या कृतींचा पुस्तकरूपी वारसा सर्वांना उपलब्ध करून द्यावा अशी प्रेमळ इच्छा व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली .






