कार चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी १२ लाखांची लाच घेणारा पोलीस अधिकारी जाळ्यात

police-bribe
file photo

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ॲन्टिलिया स्फोटके आणि मनसुख हत्या प्रकरणापासून धुळीस मिळालेली प्रतिमा पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला शुक्रवारी आणखी एक तडा गेला आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक यांना ॲन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने दोन लाख रुपयांची लाच घेताना पकडले.

मालमत्ता कक्षाकडे बीएमडब्ल्यू कार चोरीचे प्रकरण तपासाकरीता आहे. या गुन्ह्यात एका महिलेचे पती आणि त्यांचा मित्र यांचा सहभाग आढळत होता. या दोघांवर कारवाई न करण्यासाठी नागेश पुराणिक यांनी १२ लाखांची मागणी केली. पती आणि त्यांच्या मित्राला कारवाईपासून वाचविण्यासाठी महिलेने चार लाख रुपये काही दिवसांपूर्वी दिले. उर्वरीत आठ लाखांसाठी पुराणिक तगादा लावू लागले. एवढी रक्कम जमविणे शक्य नसल्याने तडजोडी अंती आणखी चार लाख रुपये देण्याचे ठरले.

महिलेला चार लाखाची रक्कम जमा करणे अशक्य जात होते आणि पुराणिक पैशांसाठी मागे लागले असल्याने या महिलेने ॲन्टी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून ॲन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने मालमत्ता कक्षाच्या भायखळा येथील कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदार महिलेकडून दोन लाख रुपये घेताना पुराणिक यांना पकडण्यात आले. ॲन्टी करप्शन ब्युरोने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here