बीड (सुमित निसर्गध) – कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असतानाच्या या दुसर्या टप्प्यात डॉक्टर अभिजित सायमबर यांची मुलाखत घेऊन कोरोनाबाबत तुमच्या-आमच्या मनात नव्याने उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी डॉ. सायंमब यांनी तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, या आजाराबाबत गंभीर होणे गरजेचे आहे. सतत मास्क लावला, 30 सेकंद हात धुवा आणि एकट्याने दिनक्रम पार पाडण्याची सवय लावून घ्या. ही शिस्त पाळली तरच कोरोनापासून बचाव होऊ शकतो.
प्रश्न – कोरोना विषाणु आता हवेतूनही परसतो असे सांगतात.
डॉ. सायंबर – होय, हा विषाणु हवेतूनही पसरतो असे जागतिक आरोग्य संस्थेने जाहीर केले आहे. पण हा हवेतून कसा पसरतो ते लक्षात घ्या. एका खोलीत दोन व्यक्ती बसल्या असतील आणि त्यातील एकाला कोरोना झाला असेल तर त्या व्यक्तीच्या श्वासातून हा कोरोना हवेत जातो. पण हा जीवाणू जड असल्याने तो चार-पाच मिनिटेच हवेत राहतो. या चार पाच मिनिटांत त्या विषाणुचा दुसर्या व्यक्तीशी संपर्क आला तर तो त्याच्या शरीरात शिरू शकतो. यासाठीच मास्क घालणे गरजेचे आहे. हा हवेत जास्तीत जास्त 4 मिनिटे राहत असल्याने खुल्या ठिकाणी हा धोका फार नसतो.
प्रश्न – हा विषाणु 14 दिवसांत मरतो का?
डॉ. सायंबर – कोरोनाची लागण झाली तर तो 14 दिवसात बरा होतो. तसेच दहा दिवसानंतर लक्षणे नसतील तर अश्या रूग्णांपासून इतरांना संसर्ग फार कमी प्रमाणात होतो. आजार बरा झाला तरी अशक्तपणा राहतो. त्यासाठी व्यायाम, योगा व फिजीओथेरापी आवश्यक आहे.
प्रश्न – असे असेल तर मग दहा दिवस लॉकडाऊनचा उपयोग काय? त्यात लॉकडाऊन जाहीर केले की त्या आधीचे दोन दिवस खरेदीला झुंबड उडून फैलाव होतोच.
डॉ. सायंबर – लॉकडाऊन करण्यामागे शास्त्रीय कारणे आहेत. आपण लॉकडाऊन केल्यानेच स्थिती आटोक्यात आहे. लॉकडाऊन जाहीर केले की, खरेदीला झुंबड उडणार हे प्रशासनाला माहीत असते. पण पुढचे दहा-पंधरा दिवस लोकांचा एकमेकांशी संपर्क होत नाही. विज्ञानानुसार जर लक्षणे नसतील तर दहा दिवसांनंतर शरीरातील कोरोना विषाणुचा दुसर्याला संसर्ग होऊ शकत नाही. फक्त जर ताप असेल किंवा इतर लक्षण असेल असेल अशांच्याच शरीरातील विषाणुचा संसर्ग होतो. ज्यांच्या शरीरात विषाणु आहे, पण लक्षणे नाहीत त्यांच्याकडून दहा दिवसांनंतर दुसर्याला संसर्ग होत नाही. यासाठी लॉकडाऊन करून दहा दिवस घरी बसवले की दुसर्याला संसर्ग होण्याची शक्यता संपते. यासाठी लॉकडाऊन करणे महत्वाचे आहे.
प्रश्न- आता नोकरीवर जावे लागते त्यामुळे बाहेर पडावेच लागते.
डॉ. सायंबर – होय, आवश्यक आहे तिथे बाहेर जावे लागते. परंतु तेव्हा आपण काळजी घ्यायला हवी. बसने जात असाल तर एका सीटवर एकच जण बसा, बस भरलेली असेल तर त्यात चढू नका. दुसर्या बसची वाट बघा. ट्रेनने जात असाल तर एका सीटवर दोघच बसा. जागा नसेल तर उभे राहून प्रवास करा. सतत मास्क लावा. काहीजण नाक उघडे ठेवतात. हे योग्य नाही. काही गळ्यात मास्क अडकवून फिरत असतात. हे तर सर्वात धोक्याचे आहे. कारण गळ्यात मास्क अडकवला तर त्या मास्कच्या आतील बाजूला विषाणु येऊ शकतो. मग तुम्ही तो मास्क जेव्हा तोंडावर लावता तेव्हा मास्कवरील विषाणु थेट तोंडातून आत जातो.
प्रश्न – आणखी कोणती काळजी घ्यायची?
डॉ. सायंबर – ऑफीसमध्ये एकपेक्षा जास्त व्यक्ती असतील तर पूर्णवेळ मास्क लावून बसा. आपल्या सहकार्यांबरोबर एकत्र जेवायचे नाही की चहा प्यायचा नाही. आपली तशी संस्कृती नाही. पण यातून बचाव करायचा असेल तर एकटेपणाने दीनचर्या करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. सकाळी व्यायामाला जाताना, बाजारात जाताना अंतर ठेवायचेच. अगदी कुटुंबातील कुणी असले तरी बाहेर गेल्यावर अंतर ठेवून चाला. घरी आल्यावर कपडे साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवायचे, आपल्या शरीराचा जो भाग कपड्याने झाकलेला नसतो त्या भागावर साबण लावुन 30 सेकंदपर्यंत ठेवावे. त्यानंतरच ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आपल्याला साबन लावले की लगेच पाण्यानी धुण्याची संवंय असते. ती बदलावी लागेल. गरम पाणी प्यायचे, मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या, कच्चे काहीही अजिबात खायचे नाही. फ्रिजमधील पदार्थ बाहेर काढून त्याचे तापमान सामान्य झाल्यावरच तो पदार्थ खायचा. हळद सुंठ घालून गरम दूध प्यायचे.
प्रश्न – पण जे घरात राहतात त्यांनाही कोरोना कसा होतो?
डॉ. सायंबर – ते घरातच राहतात. परंतु त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती दूध आणायला, भाजी आणायला, सामान आणायला बाहेर जात असते. ही व्यक्ती बाहेर जाऊन संसर्गाने कोरोना घरात घेऊन येते आणि मग सर्वांना लागण होते. युवा पिढीला मला विनंती करायची आहे की, या आजारातून रुग्ण बरे होतात म्हणून बाहेर उगाच फिरू नका. कारण बाहेर फिरल्याने तुम्हाला लागण झाली तर ती घरच्यांना होते. तुम्ही यातून बरे व्हाल. पण घरी वृद्ध, हायपर टेन्शन, मधुमेह अशा व्याधी असणारे असतात त्यांना मोठा धोका निर्माण होतो. घरातल्यांची काळजी असेल तर उगाच बाहेर भटकू नका.
प्रश्न – एखादा कोरोनातून बरा झाला असेल तर त्याला परत कोरोना होऊ शकतो का?
डॉ. सायंबर – कोरोनातून बरा झालेल्या रुग्णात जर अॅण्टीबॉडी तयार झाल्या असतील तर त्याला पुन्हा कोरोना लवकर होत नाही. पण त्याला सौम्य आजार असेल आणि अॅण्टीबॉडी निर्माण होण्यापूर्वी विषाणु गेला असेल तर त्याला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता असेल. यासाठी या आजारातून बरे झालेले असतात त्यांनीही इंतरांप्रमाणे मास्क लावणे, गरम पाणी पिणे ही सर्व काळजी घेत राहायची असते.
प्रश्न – कोरोनाशी लढा देऊन पूर्ण बरे झाल्यावरही अनेकांना खूप थकवा जाणवतो?
डॉ. सायंबर – कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला पुढे चार आठवडे थकवा जाणवू शकतो. याचे कारण हा विषाणु फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे फुफ्फुसाची क्रिया कमकुवत होते आणि हवेमधून ऑक्सीजन घेऊन ते शरीराभर पोचविण्याचे त्याचे कार्य कमी होते. फुफ्फुस पूर्ण बरे होण्यास चार आठवडे लागतात. म्हणून तितका काळ थकवा जाणवू शकतो. या काळात फिजिओथेरपी करायची. व्यायाम करायचा.
प्रश्न – कोरोना आजारातून बरा झालेल्या रुग्णाला प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे?
डॉ. सायंबर – कोरोनाशी लढा देताना रुग्णाच्या शरीरात प्रतिकार करणार्या अॅण्टीबॉडी तयार होतात. हा रुग्ण बरा झाल्यावरही त्याच्या रक्तातील प्लाझ्मात या अॅण्टीबॉडी राहतात. त्याने जर प्लाझ्मा दान केले तर तो प्लाझ्मा दुसर्या रुग्णाला दिल्याने त्याच्या रक्तात या अॅण्टीबॉडीज जातात आणि त्या तेथील कोरोना विषाणुशी लढतात. यासाठी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करीत आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे विशेष लक्ष देऊन प्लाझ्मा दानाची सोय केली आहे.
प्रश्न – खाजगी आणि सरकारी चाचणीत एकाच व्यक्तीचे दोन वेगळे अहवाल येतात ते कसे?
डॉ. सायंबर – खाजगी आणि सरकारी चाचणीसाठी तोच स्वॉब दिला तर अहवाल वेगळे येणार नाहीत. पण वेगळे स्वॉब दिले तर अहवाल वेगळे येऊ शकतात. कारण दोन चाचण्यांमध्ये वेळेच अंतर असते. शिवाय स्वॉब घशातून घेतला आणि नाकातून घेतला तरी फरक पडतो.
डॉ. अभिजित सायंबर यांनी अखेरीस आवाहन केले की, पुढील तीन महिने काळजी घ्यायची आहे. हा आजार गंभीर आहे. त्यामुळे कंटाळा आला म्हणून बेफिकीर होऊ नका. आपण आजवर खूप फिरलो. आता काही काळ अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा . तेव्हा मास्क लावा, हात धुवा, कच्चे काही खाऊ नका, सामान 24 तास दाराबाहेर ठेवून मगच घरात घ्या, गरम पाणी प्या. स्वत:ची काळजी घ्या आणि आपल्यामुळे इतरांना लागण होणार नाही याची काळजी घ्या.







