गोकुळधाम सोसायटीतील मोबाईल दुकानात डल्ला मारणाऱ्या चौघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : टीव्हीच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेल्या गोरेगाव पूर्वेला असलेल्या गोकुळधाम सोसायटीतील गोकुळ मोबाईल शॉप या दुकानाचे शटर तोडून लाखो रुपये किमतीच्या मोबाईलसह सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरट्यांनी चोरुन नेली होती. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत चौघा जणांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांच्या झोन १२ च्या डीसीपी डॉ डी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिसांनी ३ विशेष पथके तयार करून चोरांचा शोध सुरू केला. दिंडोशी पोलिसांनी मुंबईसह आसपासच्या भागातून चोरलेल्या संपूर्ण मुद्देमालासह चार चोरांना अटक केली आहे.

डीसीपी डॉ डी स्वामी यांनी सांगितले की, मोबाईल दुकानातून विविध कंपन्यांचे १६७ महागडे मोबाईल फोन चोरीला गेले होते, ज्याची किंमत ३२ लाख ३८ हजार ३३८ रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आणि तीन ते चार दिवस सीसीटीव्ही फूटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. कठोर प्रयत्नांनंतर पोलिसांनी चार आरोपींना मुंबई आणि आसपासच्या परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.

या प्रकरणी महेंद्र कुमार थानाराम मेघवाल (मुख्य आरोपी), मयूर संजय खैरे उर्फ जया (रिक्षा चालक), रमेश ताराचंद पोरवाल, तेजस हरी आंबेकर उर्फ सोनू (व्यापारी-खरेदीदार) यांना अटक केली असून, अटक केलेले सर्व आरोपी सराईत चोर आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत, चोरीच्या घटनेत वापरल्या जाणाऱ्या ऑटो रिक्षा आणि बुलेट बाईकच्या नंबर प्लेटवरून या चोरांना पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here