मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : कोरोना काळात ओढावलेल्या संकटामुळे अनेकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. या काळात महाविकास आघाडी सरकारने गरजू लोकांना दोन वेळचं पोटभर अन्न मिळावं म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे गेली काही महिने शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत होती. परंतु आता सर्व परिस्थिती पूर्ववत होऊ लागल्यानं मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नुकतंच महाविकास आघाडी सरकरकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या परिपत्रकात सरकारने १ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं आहे. या थाळीसाठी ग्राहकांना पुन्हा १० रुपये मोजावे लागणार आहेत. शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
सचिन ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोफत शिवभोजन थाळीसाठी राज्य सरकारकडून चारवेळा मुदतवाढ करण्यात आली होती. पाहिली मुदतवाढ १४ मे २०२१ रोजी, दुसरी मुदतवाढ १७ जून २०२१ रोजी, तिसरी मुदतवाढ ३० जून २०२१ रोजी करण्यात आलो होती. यानंतर आता १४ सप्टेंबर रोजीही एकदा मुदतवाढ करण्यात आली होती.
दरम्यान, शिवभोजन थाळीचं केंद्र चालवणाऱ्या केंद्र चालकांना थाळीमागे प्रत्येकी ४० रुपये दिले जातात. तर ग्राहकाकडून त्यांना १० रुपये मिळतात. हे अनुदान केंद्र चालकाच्या खात्यात दर १५ दिवसांनी जमा होते.






