नायजेरियन अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेल्या नायजेरियन अभिनेता चेकुमे माल्विन याला बंगळुरु पोलिसांनी बुधवारी ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. बंगळुरुतून चेकुमे माल्विन याने ‘सिंघम 2’सह जवळपास २० हिंदी, कन्नड आणि तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बंगळुरु पूर्व विभाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माल्विन हा वैद्यकीय व्हिसा अंतर्गत भारतात आला आहे. त्याने मुंबईतील न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये दोन महिन्यांचे प्रशिक्षणही घेतले होते. माल्विनने विश्वरुपम, सिंघम, अॅना बॉण्ड, दिलवाले, जांबू सवारी आणि परमात्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने तीन नॉलिवूड (नायजेरियन) चित्रपटांमध्ये भूमिका देखील केल्या आहेत.

पूर्व बंगळुरुतील एचबीआर लेआऊटमधील एका इमारतीमधून पोलिसांनी माल्विनला अटक केली. “आरोपींने प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यावसायिकांना ड्रग्ज विकले” असं पूर्व विभागाचे डीसीपी एसडी शरणप्पा म्हणाले. पोलिसांनी आरोपीकडून १५ ग्रॅम एमडीएमए, ७ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे २५० मिली हॅश ऑईल, मोबाईल फोन, २५०० रुपये रोख आणि ८ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. माल्विनवर नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ अधिनियम, १९८५ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here