पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने कर्करुग्णाचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दुर्धर अशा कर्करोगाशी झुंज देत असताना उपचारांसाठी आपल्या आयुष्यभराची ४१ लाख रुपयांची पुंजी परत मिळवून द्यावी, या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथील एका रुग्णाने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे साकडे घातले आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देऊन आपली कैफियत संबंधित रुग्णाने मांडली आहे.

अरुण बाजीराव गडदे (रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे, तळेगाव दाभाडे) यांनी प्रवीण दरेकर यांना साकडे घातले आहे. गडदे यांच्या समवेत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक तसेच गडदे यांचे पुत्र सागर गडदे व भाचे संतोष काटे, मीरा काटे उपस्थित होते. यापूर्वी गडदे यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे व मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना या संदर्भात निवेदन दिले आहे.

मुंबई येथील मंगलमूर्ती एन्टरप्रायझेसचे मालक प्रकाश जनार्दन लामगे यांच्या विरोधातील पाच वर्षांपूर्वी दाखल झालेल्या फसवणूक आणि मोफा कायद्या अंतर्गत गुन्ह्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच आपले ४१ लाख रुपये परत मिळवून देऊन जीवनाची लढाई जगण्यासाठी मदत करावी, अशी कळकळीची विनंती गडदे यांनी निवेदनात केली आहे.

गडदे यांनी नऊ वर्षांपूर्वी मुंबई येथील विकासक प्रकाश जनार्दन लामगे यांच्याशी फ्लॅट खरेदीबाबत रीतसर आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र अद्यापही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. मुंबईत खेतवाडी सातवी गल्ली, खेमराज श्री कृष्णदास मार्ग, गिरगाव डिव्हिजन येथील प्लॉट क्रमांक ८२६ येथील अरब बिल्डिंगमध्ये ४०० चौरसफूट क्षेत्रफळाचा फ्लॅट खरेदीसाठी 41 लाख रुपयांचा व्यवहार करून तसा नोंदणीकृत करार केला. ठरल्याप्रमाणे गडदे यांनी सर्व रक्कम धनादेशांद्वारे बिल्डरला देऊ केली. अद्यापही प्रकाश लामगे यांनी अरुण गडदे यांना फ्लॅटचा ताबा दिलेला नाही.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्रॉफर्ड मार्केट येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाकडे प्रकाश लामगे यांच्या विरुद्ध २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडदे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here