जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल वाजला

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात दि. ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरूवात होणार असून दि. १८ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दि. २० रोजी छाननी होणार आहे. दि. २१ पासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत राहणार आहे. त्यानंतर अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार असून दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि. २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय कार्यान्वीत करण्यात आले आहे. वाहने आणि विश्रामगृह देखिल सहकार विभागाकडून अधिग्रहीत करण्यात आले आहे. बँकेच्या सभागृहातील कार्यालयात निवडणूकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीने दहा जागा मिळाव्यात यासाठी आग्रह धरला आहे. शुक्रवारी गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेण्यात आली. याबैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती समजली आहे. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, अरुण पाटील, इंदिरा पाटील, संजय पवार, वाल्मीक पाटील, संतोष चौधरी, नाना देशमुख, तिलोत्तमा पाटील उपस्थित होते. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे १३ जागा होत्या.

आता सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले तर त्यात १० जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे. कोणत्या जागांसाठी आग्रह धरायचा आणि कोणत्या सोडायचा याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेत भाजपसोबत जायला होकार दिला असला तरी या पॅनलमध्ये राष्ट्रवादी जागांबाबत तडजोड करणार नाही अशीच भूमिका घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

जिल्हा बँकेसाठी होणार्या निवडणुकीसाठी जर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा मिळत असतील तर सर्वपक्षीय पॅनलमधून निवडणूक लढा, अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपविरोधात लढा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार बैठकीत चर्चा झाली असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here