कोल्लम (केरळ) : इंडियन कोब्राचा दंश झाल्यानंतर माणूस वाचणे तसे कठीण असते. अपघाताने सर्पदंश झाल्याच्या घटना नित्याने समोर येत असतात पण नागाचा दंश घडवून हत्या करण्याच्या अत्यंत दुर्मिळ प्रकारात कोल्लम सत्र न्यायालयाने पतीला दोषी ठरवले. न्या. एम. मनोज हे हा निकाल देत असताना दोषी पती एस. कुमार (वय २८) हा हजर होता. त्याची शिक्षा १३ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.
केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील अंचल गावात एक वर्षाच्या मुलाची आई असणारी उथरा सर्पदंशाने मरण पावल्याची घटना ७ मे २०२० रोजी घडली होती. उथरा यांचा पती आणि मुलगा झोपले असताना दंश केलेला नाग त्याच बेडरूममध्ये सापडला. सर्पदंशाने झालेला हा मृत्यू असण्याची शक्यता स्थानिक पोलिसांनी तातडीने फेटाळून लावली होती. कारण २ मार्च २०२० ला उथराला तिच्या सासरी वायपर प्रजातीच्या सापाच दंश झाला होता. त्यामुळे तिला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यामुळे या मृत्यूच्या सखोल तपासाची मागणी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला.
कोल्लम ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हरिशंकर यांनी जातीने या तपासात लक्ष घातले. उथरा यांचा खासगी फायनान्स कंपनीत काम करणारा पती एस. कुमार याने हा कट रचून अंमलात आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. आपल्या पत्नीचा खून करण्यासाठी एक वायपर आणि एक नाग कुमारने एका सर्पमित्राकडून विकत घेतला होता. वायपर प्रजातीच्या सापाचा दंश घडवून मारण्याचा त्याचा कट तिला रुग्णालयात दाखल करावे लागल्याने मार्च २०२० मध्ये फसला. त्यानंतर त्याने नागाचा वापर करून दोन महिन्यांनी हाच प्रयोग सत्यात उतरवला. तिला सापाचा पहिला दंश झाल्यावर ती जवळपास ५० दिवस रुग्णालयात दाखल होती, असा दावा पोलिसांनी केला.






